Bad weather hits Akola: अवकाली पावसामुळे अकोला जिल्ह्यातील ४ हजार ६० हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये प्रामुख्याने कांदा, गहू, मका, ज्वारी, केळी, बळ पिकांसह भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला.
अकोलाः जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह झालेल्या अवकाली पावसामुळे अकोला जिल्ह्यातील ४ हजार ६० हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये प्रामुख्याने कांदा, गहू, मका, ज्वारी, केळी, बळ पिकांसह भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला.
अकोला जिल्ह्यात ८ व ९ एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. बुधवार १० एप्रिल रोजी देखील अकोला शहरासह जिल्ह्यातील काही भागात पाऊस बरसला. या अवकाळी पावसाचा फटका शेतीपिकांसह घरांनाही बसला. जिल्ह्यातील काही भागात घरांचे किरकोळ नुकसान झाले, तर सुमारे ४ हजार ६० हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले.
सर्वाधिक फटका पातूर तालुक्यात
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ७४ गावांमधील ४ हजार ६० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक फटका पातूर तालुक्याला बसला आहे. पातूर तालुक्यातील २४ गावांमधील २ हजार ८६६ हेक्टर क्षेत्रफळावर पिकांचे नुकसान झाले आहे. तेल्हारा तालुक्यात ३१ गावांमध्ये ९२९ हेक्टर, बाळापूर तालुक्यातील १२ गावांमध्ये २५० हेक्टर, मुर्तीजापूर तालुक्याती ४ गावांमध्ये १० हेक्टर, तर बार्शिटाकळी तालुक्यातील ३ गावांमध्ये ५ हेक्टर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात ५५ घरांचे नुकसान
वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात ५५ घरांचे नुकसान जाले. यामध्ये अकोट तालुक्यात ४ घरांचे पूर्णतः नुकसान झाले, तर १२ घरांचे किरकोळ नुकसान झाले. तसेच अकोला तालुक्यात ३६ घरांचे, मुर्तीजापूर तालुक्यात ३ घरांचे किरकोळ नुकसान झाले.