Lok Sabha Election 2024 Schedule ः देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून १९ एप्रिल पासून सात टप्प्यांत मतदान होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवार १६ मार्च रोजी निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली.
नवी दिल्ली ः संपूर्ण देशाला उत्कंठा लागून राहिलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची घोषणा शनिवार १६ मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार आणि सुखबीरसिंह संधू यांनी लोकसभा निवडणुकांच्या तारकांची घोषणा केली.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार, देशभरात १९ एप्रिल पासून ७ टप्प्यांत निवडणूक होणार आहे. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे. त्यानंतर ४ जुन रोजी निकाल जाहिर करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान होणार असून १९ एप्रिलला पहिला टप्पा, २६ एप्रिलला दुसरा टप्पा, ७ मे रोजी तिसरा टप्पा, १३ मे रोजी चौथा टप्पा तर २० मे रोजी पाचवा आणि अखेरच्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे. याच दरम्यान ४ राज्यांमधील २६ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होणार आहेत.
असे होईल मतदान (Lok Sabha Election 2024)
टप्पा १:- १९ एप्रिल २०२४ (१०२ जागा)
टप्पा २:- २६ एप्रिल २०२४ (८९ जागा)
टप्पा ३:- ०७ मे २०२४ (९४ जागा)
टप्पा ४:- १३ मे २०२४ (९६ जागा)
टप्पा ५:- २० मे २०२४ (४९जागा)
टप्पा ६:- २५ मे २०२४ (५७ जागा)
टप्पा ७:- १ जून २०२४ (५७ जागा)
मतमोजणी :- ४ जून २०२४
निवडणुका जाहीर होताच संपूर्ण देशात आचारसंहिताही लागू झालेली आहे. निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी अनेक नवी पावले उचलण्यात आल्याचा दावा आयोगाने केला आहे. या वेळी लोकसभा निवडणुकीत देशातील सुमारे ९७ कोटी मतदार हक्क बजावणार आहेत.