IPL betting boom in Akola: अकोल्यात आयपीएल सट्टेबाजीने धुमाकूळ घातला असून मागील पाच दिवसात दोन ठिकाणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत १७ आरोपींवर गुन्हे दाखल केले असून त्यांच्याकडून १ लाक ६८ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अकोलाः मागील पाच दिवसांत अकोल्यात दोन ठिकाणी आयपीएलच्या सट्ट्यावर कारवाई करण्यात आली. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १७ आरोपींवर कारवाई केली असून त्यांच्याकडून १ लाक ६८ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सध्या सर्वत्रच आयपीएलने धुरळा उडवला आहे. अशातच अकोल्यात सट्टेबाजांनी धुमाकुळ घातल्याचे गत पाच दिवसांत झालेल्या कारवाईवरून निदर्शनास येत आहे. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मागील पाच दिवसांत शहरातील विविध भागात आयपीएलच्या सट्ट्यावर कारवाई केली आहे. शुक्रवार ५ एप्रिल रोजी बार्शिटाकळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ग्राम कान्हेरी सरफ येथील हाॅटेल राजवाडाच्या मोकळ्या जागेत सुरू असलेल्या आयपीएल सट्ट्यावर पोलिसांनी कारवाई केली.
या कारवाईत पोलिसांनी आरोपी शेख रमजान शेख कालु गौरवे (३४ रा. मोठी खडकी अकोला), वैभव पांडुरंग फेड (३१ रा. खडकी) हे मोबाईल लिंकवर आय.डी. तयार करुन पैश्यांच्या हारजितवर आयपीएलच्या सनराईझर हैद्राबाद विरुद्ध चैन्नई सुपर किंग्स सामन्यावर सट्ट्याचा जुगार लावताना आढळून आले. त्यांच्याकडून एक मोबाईल, एक दुचाकी व इतर साहित्य, असा एकूण १ लाक १३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यातील आणखी आरोपींचा शोध सुरू असून खायवाळी करणारे व गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार यांचा तपास सुरू आहे.
यापूर्वी १ एप्रिल रोजी डाबकी रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत फुकटपुरा भागातील नेहरू नगर परिसरात मुंबई इंडियन्स विरूद्ध राजस्थान राॅयल्स सामन्यावर सुरू असलेल्या सट्ट्यावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाीत पोलिसांनी विवेक नंदलाल मुंदडा (५१ रा. भुईभार हाॅस्पिटल जवळ रामदासपेठ) याच्याकडून मोबाईल, टॅब व नगदी ५४ हजार ५३० रुपये जप्त केले. आरोपी विरुद्ध डाबकी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच तपासादरम्यान खायवाळी करणारे आरोपी दिनेश भुतळा, युश राजेश तिवारी (दोन्ही रा. शेगाव जि. बुलढाणा), योगेश ओमप्रकाश अग्रवाल (रा. साईनगर जि. अमरावती), रविंद्र मोतीराम दामोदार (रा. रमेश नगर डाबकीरोड अकोला), अमोल श्रीधर ठाकरे (रा. श्री क्षेत्र नागझरी जि. बुलढाणा), प्रदीप सुर्यभान सोनटक्के (रा. तेल्हारा जि.अकोला), प्रवीणसिंग राजपालसिंग चव्हाण (रा. बाळापूर जि. अकोला), हे असल्याचे निष्पन्न झाले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, पोलीस अंमलदार फिरोज खान, भास्कर धोत्रे, खुशाल नेमाडे, रवि खंडारे, अविनाश पाचपोर, आकाश मानकर, धीरज वानखडे, अभिषेक पाठक, मो. आमीर यांनी केली आहे.