Lok Sabha Elections: अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी पहिल्याच दिवशी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. तर आज 19 एप्रिल रोजी दुसऱ्या दिवसाअखेर सात उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, यामध्ये हर्षवर्धन जाधव यांच्या दुसऱ्या अर्जाचा समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या अर्ज वितरणाला गुरुवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी 60 जणांनी 118 उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी पहिल्याच दिवशी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. तर आज 19 एप्रिल रोजी दुसऱ्या दिवसाअखेर सात उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, यामध्ये हर्षवर्धन जाधव यांच्या दुसऱ्या अर्जाचा समावेश आहे.
रविवार वगळता 25 एप्रिलपर्यंत उमेदवारांना सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारपासून सुरुवात झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणार असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी पहिल्या दिवशी 60 जणांसाठी 118 उमेदवारी अर्ज वितरीत करण्यात आले. येत्या 25 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मात्र, रविवारची सुट्टी असल्यामुळे 21 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत अशी माहिती जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिली.
असे दाखल झाले आतापर्यंत उमेदवारी अर्ज
हर्षवर्धन जाधव यांनी आतापर्यंत दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यासोबतच मनीषा उर्फ मंदा खरात (बहुजन महा पार्टी), खान एजाज एहमद मो. बिस्मिल्लाह खान (अपक्ष), सुरेश आसाराम फुलारे (अपक्ष), खाजा कासीम शेख (अपक्ष), बबनगीर उत्तमगीर गोसावी (हिंदुस्थान जनता पार्टी) असे एकूण सात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
संदीपान भुमरे, विनोद पाटलांनी घेतले उमेदवारी अर्ज
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या शिंदेसेनेचे नेते तथा पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी एक उमेदवारी अर्ज घेतला असून, विलास संदीपान भुमरे यांनी दोन, विनोद नारायण पाटील यांनी तीन उमेदवारी अर्ज घेतले आहेत.