After the death of the daughter: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव येथे एका १९ वर्षीय मुलीला जीव गमवावा लागला. उपचाराअभावी मुलीचा मृत्यू झाल्याने हतबल पित्यानेही त्यांचे जीवन संपविल्याची हृदय हेलावून टाकणारी घटना सोमवार ८ एप्रिल रोजी समाेर आली. या घटनेनंतर सोयगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
छत्रपती संभाजीनगर : विकासाच्या चर्चा कितीही होत असल्या, तरी तो अद्याप गावापर्यंत पोहाोचला नाही. असेच काहीसे वैद्यकीय सुविधांच्या बाबतीत म्हणावे लागेल. परिणामी अनेकांना उपचारा अभावीच आपले प्राण गमवावे लागतात. अशीच हृदयद्रावक घटना सोमवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव येथून समोर आली. १९ वर्षीय वैष्णवी दीपक राऊत हिला उपचारा अभावी जीव गमवावा लागला. या घटनेनंतर हतबल झालेले पिता दीपक राऊत (४२) यांनीही आपली जीवनयात्र संपविल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव नगरपंचायतीमध्ये दीपक राऊत पाणीपुरवठा विभागात नोकरीला होते. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी बबन तडवी यांनी पाणीपुरवठा कर्मचारी दीपक राऊत यांना तीन महिन्यांपूर्वी कुठलीच सूचना न देता तडकाफडकी निलंबित केले होते. त्याचबरोबर त्यांचे मासिक वेतन ही रोखून ठेवले होते. त्यामुळे ते आर्थिक विवंचनेत होते. त्यातच त्यांची मुलगी वैष्णवी आजाराशी झुंज देत होती. पैसाअभावी तिच्यावर वेळेत उपचार न झाल्याने तिचा ८ एप्रिल रोजी मृत्यू झाला. याचा मानसिक धक्का दीपक राऊत यांना बसला. हा धक्का सहन न झाल्याने त्यांनी मुलीवर अंत्ययसंस्कार केल्यानंतर रविवारी रात्री २ वाजता घरात गळपास घेऊन जीवन संपविले.
नातेवाईकांचा नगरपंचायतीसमोर आक्रोश
दीपक राऊत यांच्या मृत्यूनंतर राऊत यांच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी राऊत यांचा मृतदेह नागरपंचायतसमोर आणून ठेवला. जो पर्यंत दीपक राऊत यांना न्याय मिळत नाही आणि नगरपंचायत मुख्यधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यत मृतदेह उचलणार नाही, असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला. यावेळी नगर पंचायतीच्या आवारात मोठा जमाव जमा झाला होता.